गडचिरोली - जिल्ह्यातील 361 ग्रामपंचायतीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 जानेवारी तर दुसऱ्या टप्प्यात 20 जानेवारीला मतदान होणार आहे. नामांकन दाखल करणे तसेच उमेदवारी मागे घेण्याची तारीख गेली असून 1 हजार 554 जागांसाठी जवळपास 3 हजार उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी मागे घेण्याच्या सोमवारी (दि. 4 जाने.) शेवटच्या दिवशी जवळपास अडीचशेहून अधिक उमेदवारांनी माघार घेतली. तरीही तीन हजार उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे शंभरहून अधिक उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
दोन टप्प्यात होणार मतदान
गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली व धानोरा या तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये 15 जानेवारीला मतदान होईल. तर चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 20 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. दोन्ही टप्प्यासाठी सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. दोन्ही टप्प्याची मतमोजणी 22 जानेवारीला होणार आहे.
तीन हजार मतदार पहिल्यांदाच करणार मतदान
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस 3 हजार 800 नवीन मतदार वाढले आहेत. त्यापैकी तीन हजार मतदार ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 361 ग्रामपंचायतीसाठी ही सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 5 लाख 42 हजार 37 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातच काही ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, कोरोना संकट वाढत गेल्यानंतर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. यादरम्यान आणखी काही ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीची संख्या वाढली आहे.