गडचिरोली -विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील मार्कंडादेव येथे आजपासून महाशिवरात्री यात्रेला सुरुवात झाली. वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेला मार्कंडेश्वर मंदिराने आजही आपले वैभव कायम ठेवले असून आजपासून १५ दिवस शिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या यात्रेला राज्यासह इतर राज्यातून भाविक येतात. आजची पूजा ही राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते पार पडली.
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडाचे मार्कंडेय स्वामी हे देवालय भारतातील खजुराहो येथील चंदेलांच्या देवळासारखे दिसते. मार्कंडा येथील देवळे खजुराहो देवळानंतरची आणि यादव काळापूर्वीची असल्याचे मानले जाते. या देवळाचा गाभारा ११०० वर्ष पुरातन असून आकर्षक नक्षिकामाने नटलेला आहे. वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर बांधलेल्या या प्राचीन देवस्थान परिसरात वैनगंगा प्रवाह उत्तर वाहिनी झाल्यामुळे भाविकांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे समजले जाते. दरवर्षी या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यातून भाविक येतात.