गडचिरोली :1 मे रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणला. यात 15 जवानांना वीरमरण आले होते. या घटनेची मास्टर माईंड तसेच इतर 65 गुन्हे नोंद असलेली जहाल नक्षली नर्मदाक्का उर्फ नर्मदा उर्फ उप्पगुंटी निर्मलाकुमारी (58) व तिचा पती राणी सत्यनारायण उर्फ किरण उर्फ किरणदादा (70) याला गडचिरोली पोलिसांनी मंगळवारी रात्री सिरोंचा बसस्थानक येथून अटक केली आहे. या दोघांनाही गडचिरोली जिल्हा न्यायालयाने 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी माहिती दिली नर्मदाक्का ही नक्षलवादयांच्या दंडकारण्य स्पेशल झोन समितीची सदस्य तसेच वेस्टर्न सबझोनल प्रमुख होती. ती मूळची रा. कोडापावनुरु, गलावरम मंडल जिल्हा कृष्णा (आंध्रप्रदेश) येथील रहिवासी आहे. तर तिचा पती राणी सत्यनारायण उर्फ किरण हा रा. नरेंद्रपुरम, अमलापुरम जवळ, राजानगरम मंडल, जिल्हा ईस्ट गोदावरी (आंध्रप्रदेश) येथील रहिवासी आहे.
गडचिरोली पोलीस गेल्या अनेक दिवसांपासुन या दोन जहाल नक्षलवादयांच्या मागावर होते. ते दोघेही तेलंगणा राज्यातुन सिरोंचा मार्गे गडचिरोली जिल्हयात प्रवेश करणार असल्याची माहिती गडचिरोली व तेलंगणा पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तेलगंणा पोलीसांच्या सहकार्याने गडचिरोली पोलीस दलाने सिरोंचा येथे सापळा रचुन नर्मदाक्का व तिचा पती किरण या दोघांना बस स्थानकावरून ताब्यात घेतले आहे.
नर्मदाक्का हिचा नक्षलवादयांनी पोलीसांविरूध्द घडवुन आणलेल्या अनेक नक्षल गुन्हयांत सक्रिय सहभाग होता. यामध्ये १ मे २०१९ रोजी जांभुळखेडा येथे नक्षलवादयांनी घडवुन आणलेला भूसुरुंग स्फोट तिच्याच नियोजनात घडला होता. यात तिचा पती किरण याचाही मुख्य सहभाग होता. याचबरोबर नक्षलवादी नर्मदाक्का हिचेवर हत्तीगोटा ब्लास्ट, लाहेरी ब्लास्ट, सुरजागड पहाडावर वाहनांची जाळपोळ, पुस्टोला ब्लास्ट, शिक्षकांची निर्घृण हत्या असे 65 गंभीर गुन्हे गडचिरोली जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत नोंद आहेत.
तर तिचा पती किरण हा दंडकारण्य पब्लीकेशन टिमचा प्रमुख आहे. तसेच नक्षलवादयांच्या प्रभात मासिकाचा देखील तो प्रमुख आहे. त्यामुळे दोघांवरही राज्य शासनाने प्रत्येकी 25 लाख असे 50 लाखांचे बक्षिस ठेवले होते. या दोघांच्याही अटकेमुळे नक्षल चळवळीचा मोठा हादरा बसला असून गडचिरोली पोलिसांना मोठे यश हाती लागले आहे.