गडचिरोली- महाराष्ट्र दिनी संपूर्ण राज्यभरात पोलीस जवानांचा सत्कार होत असतानाच गडचिरोलीत दुर्दैवी घटना घडली. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ जवानांना वीरमरण आले होते. त्याचबरोबर खासगी वाहन चालकाचाही या स्फोटात मृत्यू झाला होता. या घटनेला आता चार दिवस उलटले असून घटनास्थळावरील खड्डा आजही त्या भयावह घटनेची साक्ष देत आहे. खड्ड्यामुळे कुरखेडा-पुराडा मार्ग चौथ्या दिवशीही बंद होता. या घटनेला जबाबदार धरून नक्षली नेता भास्करसह तब्बल ४० नक्षलवाद्यांवर पुराडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईटीव्ही भारतचा ग्राऊंड रिपोर्ट नेमकी घटना कशी घडली, याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घटनास्थळाला भेट देऊन ग्राउंड झिरो रिपोर्ट केला. त्यावेळी घटनास्थळावरील खड्डा पाहून भूसुरुंग स्फोट किती जबरदस्त होता, याची प्रचीती आली. पुलाच्या खालून पाईप लावून भूसुरुंग स्फोट घडवण्यात आला. विशेष म्हणजे हा स्फोट घडवून आणण्यासाठी पुलाच्या बाजूला झुडपांमध्ये लपून बसलेल्या नक्षलवाद्याने रिमोटद्वारे भूसुरुंग स्फोट घडवून आणला. ज्या क्षणी पुलावरून पोलिसांचे वाहन गेले नेमके त्याचक्षणी रिमोटद्वारे स्फोट घडवण्यात आला. त्यामुळे पोलीस बसलेल्या वाहनाचा अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत.
पूलाच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्याही तुटून पडल्या, तर जवानांच्या शरीरावरील कपडेही झाडांवर जाऊन अडकले आहेत. हे दृश्य घटनेच्या चौथ्या दिवशी दिसून येत होते. स्फोट घडलेल्या पूलापासून शंभर फुटांपर्यंत रस्ता दगड, माती, ऑइल आणि रक्ताने माखलेला आहे. रस्त्याच्या बाजूलाच जवानांचे उपरणेही पडून होते. यावरून घटना प्रचंड तीव्र असल्याचे जाणवते. तत्पूर्वी दादापूर येथे २७ वाहनांची जाळपोळ करून नक्षलवाद्यांनी पोलीस तिथे यावे, असा कट रचला होता आणि ते यशस्वी झाले.
घटनेची पाहणी करण्यासाठी पोलीस पथक जात असताना पोलीस बसलेल्या एका खासगी वाहनाला लक्ष करून भूसुरुंग स्फोट घडवण्यात आला होता. त्यामुळे ४ दिवसांपासून संपूर्ण पोलिसांचे लक्ष या घटनेकडे आहे. त्यामुळे दादापुरातील नक्षली बॅनर चौथ्या दिवशीही कायम आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत आणि इतर शासकीय कार्यालये दोन-तीन दिवसांपासून बंद असल्याची माहिती त्या गावातील नागरिकांनी दिली.
कोरची आणि छत्तीसगड दलमने ही घटना घडवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गतवर्षी भामरागड तालुक्यातील कसनसूर-बोरीया जंगलात पोलीस-नक्षल चकमकीत ४० नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले होते. तर २७ एप्रिलला भामरागड तालुक्यातील एका चकमकीत भामरागड दलमची कमांडर रामको आणि दलम सदस्य शिल्पा धुर्वा या दोघींना पोलिसांनी कंठस्नान घातले. त्यामुळे नक्षल चळवळीचा नेता असलेला रामकोचा पती भास्करने ही घटना घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या चौथ्या दिवशी दिल्ली येथील शोधपथक घटनास्थळी दाखल होऊन घटनेची चौकशी केली. त्यामुळे चौकशीअंती काय निष्पन्न होते? आणि पोलीस नक्षल्यांविरुद्ध कोणती रणनीती आखतात? याकडे आता लक्ष लागून आहे.