गडचिरोली - महाराष्ट्र दिनी जांभुळखेडा जवळील लेंडारी नाल्यावर नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात तब्बल 15 पोलीस जवान व एक खासगी वाहन चालक हुतात्मा झाले. या घटनेला कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांना जबाबदार धरून जवानांच्या कुटुंबीयांनी थेट मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांसमोर आरोप केले होते. त्यामुळे काळे यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून धानोरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांना पदभार देऊन त्यांच्याकडे घटनेचा तपासही सोपविण्यात आला आहे.
गडचिरोली नक्षल हल्ला : कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी सक्तीच्या रजेवर
गडचिरोली नक्षल हल्ल्याप्रकरणी कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांना जबाबदार धरून जवानांच्या कुटुंबीयांनी थेट मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांसमोर आरोप केले होते. त्यामुळे काळे यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
कुरखेडा तालुक्यातील पप्लेन एरिया समजल्या जाणाऱ्या दादापूर परिसरात यापूर्वी नक्षलवाद्यांच्या फारशा हालचाली नव्हत्या. 18 वर्षांपूर्वी या परिसरात नक्षलवाद्यांनी एकाची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर अशी कुठलीही मोठी घटना या भागात घडली नव्हती. मात्र, महाराष्ट्र दिनी जांभूळखेडाजवळ भूसुरुंग स्फोट घडवत 15 पोलीस जवानांचा बळी घेतला. या घटनेने आता पोलीस दल सतर्क झाले आहे. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांच्या हालचाली लक्षात आल्यानंतरही दुर्लक्ष का करण्यात आले, याचा तपास आता केला जात आहे.
विशेष म्हणजे, दादापूर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील 27 वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ करून पोलिसांना येण्याचे एकप्रकारे निमंत्रणच दिले होते. यावेळी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे तत्परतेने निघाले. ते जाऊन आल्यानंतर पुन्हा शीघ्र कृती दलाच्या जवानांना पाठवण्यात आले. मात्र, जवानांच्या सुरक्षेची कोणतीही दक्षता घेण्यात आली नाही आणि उघड्या असलेल्या एका खासगी चारचाकी वाहनाने पोलीस जवान जात असताना नक्षलवाद्यांनी आपला डाव साधला.
यात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिसरात नक्षल्यांनी अपप्रकार केला, तर त्या घटनास्थळी जाण्यापूर्वी परिसरातील 20 ते 25 किलोमीटर भागात तपासणी केली जाते. पोलिसांच्या भाषेत याला 'रोड ओपनिंग' म्हणतात. मात्र, अशा प्रकारची कुठलीही कारवाई न करता पोलिसांचे 15 जणांचे पथक जाळपोळीच्या घटना घटनास्थळी जायला निघाले होते.