महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीतला नक्षलवाद शून्यावर आणू; नवनियुक्त पालकमंत्री मुनगंटीवारांचा निर्धार

राज्याच्या सर्व विभागाच्या सचिवांना गडचिरोलीत येऊन आढावा घेणे बंधनकारक करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. विकास कामावर निधी खर्च करताना गुणवत्तापूर्ण कामे व्हावीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुनगंटीवार यांनी केल्या.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

By

Published : Jul 13, 2019, 3:03 PM IST

गडचिरोली - अमरीश आत्राम यांची मंत्रिपदावरून गच्छंती झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती झाली. नियुक्तीनंतर त्यांनी प्रथमच गडचिरोलीला भेट देऊन जिल्हाधिकारी सभागृहात विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नक्षलवाद शून्यावर आणण्यासाठी आपली शक्ती पणाला लावण्याचा निर्धार केला.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्याच्या सर्व विभागाच्या सचिवांना गडचिरोलीत येऊन आढावा घेणे बंधनकारक करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विकास कामावर निधी खर्च करताना गुणवत्तापूर्ण कामे व्हावीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुनगंटीवार यांनी केल्या. गडचिरोली जिल्हावासियांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, याची जाणीव ठेवून अधिकाऱ्यांनी कामाची गती वाढवावी, असे निर्देश मुनगंटीवार यांनी पहिल्या आढावा बैठकीत केले. सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री व्हावेत, अशी गडचिरोलीकरांची गेल्या काही वर्षांची मागणी होती. ती पूर्ण झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रथम आगमनाप्रीत्यर्थ जोरदार स्वागत केले.

मुनगंटीवार यांनी शासकीय कृषी महाविद्यालयात आयोजित जांभुळ-रानभाजी महोत्सवाला भेट देत कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या विविध विभागांच्या आढावा बैठकीत मुनगंटीवार यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानाची रक्कम नुकतीच वाढविली आहे. सर्व निराधार व्यक्तींच्या खात्यात ती रक्कम तत्काळ जमा करावी. यात हयगय करु नये, असे निर्देश दिले. तसेच जिल्ह्यातील रस्त्यांच्या बांधकामाकडे विशेषत्वाने लक्ष घालून चांगली यंत्रणा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या.

कृषी, सार्वजनिक बांधकाम, पोलीस व जिल्हा परिषद राबवित असलेल्या विकास कामाचा आढावा पालकमत्र्यांनी घेतला. विविध विभागातील रिक्त पदे भरण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा स्टेडियम, तालुका स्टेडियम, चामोर्शी बस स्टँड, मार्कंडेय मंदिर विकास आराखडा आदी विकास कामाचे सादरीकरण पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या. दुर्गम भागात रस्ते बांधकामाकरीता छत्तीसगडच्या धर्तीवर जिल्हा निर्माण समिती गठीत करून प्रकल्प मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. चंद्रपूर जिल्ह्याच्या धर्तीवर पालकमंत्री तक्रार निवारण हेल्पलाईन उभारण्याची सूचना त्यांनी बैठकीत केली. नक्षलवाद राज्यासाठी भूषणावह नसून तो शून्यावर आणण्यासाठी सर्वशक्तीनिशी कार्यरत राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details