गडचिरोली -कोरोना विषाणूमुळे देशभर लॉकडाऊन सुरू आहे. हीच संधी साधून आलापल्ली वनविभागातून सागवान तस्करी केली जात होती. मात्र, वनविभागाच्या पथकाने गस्त घालून लाखो रुपयांचे सागवान जप्त केले. ही कारवाई पेडीगुडम वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जमगाव गावात बुधवार व गुरुवारी करण्यात आली.
लॉकडाऊनची संधी साधून सागवान तस्करी ; लाखोंचा सागवान साहित्य व लठ्ठे जप्त काही दिवसांपूर्वी सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेल्या जिमलगट्टा वनपरिक्षेत्रातील मरपल्ली उपक्षेत्रात तीन आरोपींना वन्यप्राण्यांच्या कातडीसह तेलंगणा राज्यात अटक करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच आलापल्ली वनविभागात येत असलेल्या पेडीगुडम वनपरिक्षेत्रात समाविष्ट जामगाव गावातून लाखो रुपयांचे सागवान साहित्य आणि लठ्ठे जप्त करण्यात आले.
गोमणी उपक्षेत्रातील जामगाव गावात वनविभागाने १ व २ एप्रिलला छापा टाकून लाखो रुपयांचे सागवान साहित्य व लठ्ठे जप्त केले. एवढेच नव्हे तर तिसऱ्या दिवशी जंगलात गस्त घालून पुन्हा पाहणी केली असता, मोठ्या प्रमाणात सागवान लठ्ठे जप्त करण्यात वनविभागाला यश आले. त्यामुळे या परिसरात किती दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे आणि सदर लठ्ठे कुठे विक्रीसाठी जाणार होते, याबाबत चौकशी केल्यास मोठे मासे हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुप्त माहितीच्या आधारे जामगाव गावातील काही लोकांच्या सांधवाडीतून सागवान साहित्य आणि लठ्ठे जप्त करण्यात आले आहेत. या दोन दिवसात ८.४०० घनमीटर सागवान माल जप्त करण्यात आला. पुन्हा गस्त घालून चौकशी करण्यात येत असल्याचे आलापल्लीचे सहायक वन अधिकारी प्रदीप बुधनवार यांनी सांगितले.