गडचिरोली - जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या जिल्हाबंदी असली तरी अनेक शासकीय कर्मचारी जिल्ह्याबाहेरून ये-जा करतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही सीमा बंदीचे आदेश पोलीस अधीक्षकांनी काढले आहेत.
जिल्ह्याबाहेरून ये-जा करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठीही आता सीमा बंदी
गडचिरोली जिल्ह्यात सध्या जिल्हाबंदी असली तरी अनेक शासकीय कर्मचारी जिल्ह्याबाहेरून ये-जा करतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही सीमा बंदीचे आदेश पोलीस अधीक्षकांनी काढले आहेत.
केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच नागरिकांनी घराबाहेर पडावे. विनाकारण कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर पडू नये, ज्यांना प्रवास करणे अगदी गरजेचे आहे, अशा नागरिकांनी पोलीस दलाकडूनच ऑनलाईन पास उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. तर दुसरीकडे शासकीय नोकरदार सुट्टी निमित्त गडचिरोली मुख्यालय सोडून बाहेर जातात आणि कामाच्या दिवशी परत जिल्ह्यात येतात. या कर्मचाऱ्यांमुळे कोरोना संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सीमाबंदीचे आदेश काढले आहेत.
जिल्हाभरातील बँकांनी नागरिकांची गर्दी होऊ न देता 'सोशल डिस्टन्सिंग' राखूनच बँकेचे व्यवहार करावेत. याची संपूर्ण जबाबदारी बँक प्रशासनावर राहील. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा देणारी दुकानांनी देखील खरेदीसाठी येणारे नागरिक 'सोशल डिस्टन्सिंग' पाळतील, याची स्वतः खबरदारी घ्यावी. 'सोशल डिस्टन्सिंग' चे पालन न करणाऱ्यांवर गडचिरोली पोलीस दलाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती अधिक्षकांनी दिली.