गडचिरोली - भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणातून पाणी सोडल्याने गडचिरोली जिल्ह्यात 1992 पेक्षाही मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद आहेत. तसेच आज तिसऱ्या दिवशीही पूरपरिस्थिती कायम आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने 2400 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
गडचिरोलीत पूरस्थिती कायम; 2400 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले - गडचिरोली पूरपरिस्थिती
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बिकट पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोसीखुर्द धरणातून पाणी सोडल्याने ही पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. तरीही गडचिरोलीमधील पूर ओसरण्यास आणखी एक दिवस लागेल.
गोसीखुर्द धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच 30 हजार 500 क्यूमेक पाणी सोडण्यात आले. गोसीखुर्दच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विसर्ग आहे. 24 ऑगस्ट 2013 रोजी 16 हजार 625 क्यूमेक, तर 9 सप्टेंबर 2019 रोजी 13 हजार 739 क्यूमेक पाणी गोसीखुर्द धरणातून सोडण्यात आले होते. त्यानंतर आता सर्वाधिक पाणी सोडण्यात आले. परिणामी गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा तसेच अनेक उपनद्या व नाले फुगले असून, पाणी रस्त्यावर आले आहे.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या गोसीखुर्द धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी गडचिरोली जिल्ह्यातील पूर ओसरण्यास आणखी एक दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील पूरस्थिती उद्याही कायम राहण्याची शक्यता आहे.