गडचिरोली -चुरचुरा येथील जंगल परिसरात वाघाने हल्ला करुन ५ जनावरांना ठार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे घटनास्थळावर वाघाच्या पायाचे ठसे आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाघाच्या हल्ल्यात पाच जनावरे ठार; गडचिरोलीतील चुरचुरा जंगलातील घटना - churchura forest
गडचिरोलीतील चुरचुरा येथील जंगल परिसरात वाघाने हल्ला करुन ५ जनावरांना ठार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली.
चुरचुरा येथील गावाला लागूनच असलेल्या जंगलात चरायला गेलेल्या यशवंत उरकुडे यांच्या मालकीचे एक वासरू आणि एक गाय, गजानन शिवणकर यांच्या मालकीचे एक वासरू, अशोक पेंद्राम यांचा एक बैल तर कवडू म्हशाखेत्री यांच्या एका गायीला बुधवारी सायंकाळी वाघाने ठार केल्याची घटना घडली. यावेळी घटनास्थळावर वाघाच्या पायांचे ठसे आढळून आल्याने वाघानेच पाचही जनावरांना ठार केल्याचे निदर्शनास आले. यामुळे जनावर मालकांचे एकूण ६८ हजारांचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला. त्यांनी घटनेबाबत वनरक्षक एन. टी. गडपायले यांना माहिती दिली. आज वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक डी. एफ. विवरेकर, सहायक उपवनसंरक्षक घोंगडे, वनपरिक्षेत्राधिकारी चांगले, क्षेत्र सहायक बोरावार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी वनरक्षक गडपायले यांनी घटनास्थळ परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती दिली.