गडचिरोली :जिल्ह्यातील 12 पैकी 3 तालुक्यात सध्या एकही सक्रिय रुग्ण नाही तर, पाच तालुक्यात एक ते दोन सक्रिय रुग्ण आहेत. उर्वरित तीन तालुक्यात सहा किंवा सहापेक्षा कमी रुग्ण सक्रिय आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यांपैकी 11 तालुके कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहेत. जिल्ह्यातील एकूण सक्रिय 251 रुग्णांपैकी 229 एकट्या गडचिरोली तालुक्यातील आहेत. यामध्ये सुरक्षा दलातील कोरोनाबाधित जवानांचा समावेश मोठया प्रमाणात आहे. इतर तालुक्यात फक्त 22 कोरोनाबाधित सद्या उपचार घेत आहेत.
गडचिरोली तालुका सोडून इतर 11 तालुक्यात आत्तापर्यंत बाहेरून आलेले 131 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यापैकी 108 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तर, उर्वरित सर्व रुग्णांमध्ये सद्या लक्षणे नसल्याने तेही लवकरच कोरोनामुक्त होतील असा विश्वास आरोग्य विभागाने वर्तवला आहे. कोरोना कोविड सेंटर (सीसीसी) वडसा येथे 3, अहेरी 0, सिरोंचा 1, चामोर्शी 4, कुरखेडा 2, धानोरा 6, मुलचेरा 0, एटापल्ली 1, भामरागड 2 तर, गडचिरोली येथील वेगवेगळया तीन कोविड-19 रुग्णालयात 229 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, अहेरी, आरमोरी व कोरची या तालुक्यात एकही कोरोना रुग्ण सद्या उपचारात नाही.