गडचिरोली- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात 144 कलम लावून जमावबंदी लागू केली. मात्र, गडचिरोलीत जमावबंदी आदेशाला झुगारून लोक रस्त्यावर फिरत असून शहरातील अनेक राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. अखेर सोमवारी (दि.23 मार्च) सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी संचार बंदीचे आदेश लागू केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार 22 मार्च रोजी देशभरात जनता कर्फ्यु पाळण्यात आला. मात्र, सायंकाळी पाच वाजता थाळी व टाळीचा नाद करण्यासाठी अनेक नागरिक घराबाहेर पडत गर्दी केली आणि कर्फ्यूचे उल्लंघन झाले. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्याने जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पाच व्यक्तीचा समूह एकत्र येण्यावर बंदी आहे. मात्र, या आदेशाची सर्रास पायमल्ली होत आहे.