गडचिरोली -गडचिरोली जिल्ह्यात आज कोरोना लसीकरणाचा शुभारंभ झाला, गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिका सारिका दुधे या लसीच्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आशीर्वाद कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
गडचिरोलीमध्ये कोरोना लसीकरणाला प्रारंभ पहिल्या दिवशी 400 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस
जिल्ह्यात गडचिरोली, चामोर्शी, अहेरी आणि आरमोरी अशा चार ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर दिवसभरात 100 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आज दिवसभरात एकूण 400 जणांना ही लस देण्यात येईल. पहिल्यांदा लस घेतल्यानंतर 28 दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी 12 हजार लसी
कोरोना लसीकरणाला आजपासून प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी 12 हजार लसी देण्यात आल्या आहेत. लसीच्या पुरवठ्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 6 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
लसीकरणाचा उत्साह
गेल्या एक वर्षांपासून कोरोना लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सर्वप्रथम कोरोना योद्धे आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असला, तरी मनात भीतीही असल्याचे अनेक जण बोलून दाखवत होते. एकूणच ही लस आता सर्वसामान्य माणसाला कधी मिळणार आणि लस किती प्रभावी आहे, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.