गडचिरोली - राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी असली तरी अहेरी विधानसभा क्षेत्रांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असल्याने येथे मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळणार आहे. अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा या तालुक्यांचा समावेश असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्र राजकीय निरिक्षांचे अंदाज चुकवण्यास प्रसिद्ध आहे. यावेळी या विधानसभेत तीन दिग्गज 'आत्राम'मध्ये सामना रंगणार आहे. एकीकडे काका-पुतन्याचा तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर ठाकले आहेत. त्यामुळे कुणीही हरला तरी 'आत्राम'च आमदार बनणार हे मात्र निश्चित होईल.
अहेरी विधानसभा क्षेत्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड राहिला असून यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये अहेरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढवली आहे. या वेळेसही येथे राष्ट्रवादी काँग्रेसने जागा मागितली होती. मात्र, मागील मंत्रिमंडळ विस्तारमध्ये भाजपचे अमरीश आत्राम यांचे मंत्रिपद काढल्याने इतर पक्षाच्या उमेदवारांना भाजपच्या मेगाभरती जाण्याचे वेध लागले. माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम भाजपच्या मेगा भरतीत जाण्यास इच्छुक होते. धर्मराव बाबा आत्राम हे अमरिश आत्राम यांचे काका आहेत.