महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप सरकार 'भूमीपूजन स्पेशलिस्ट' सरकार - सत्यजित तांबे

आयत्या बिळावर नागोबा असे हे भाजप सरकार 'भूमिपूजन स्पेशलिस्ट' सरकार आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली.

By

Published : Feb 24, 2019, 11:27 PM IST

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे

गडचिरोली- भाजप सरकार स्वत: एकही काम केलं नाही. काँग्रेसने केलेल्या कामांचेच उद्घाटन करण्याचे काम भाजपचे मंत्री करीत आहेत. आयत्या बिळावर नागोबा असे हे सरकार 'भूमिपूजन स्पेशलिस्ट' सरकार आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी गडचिरोली येथे केली.

'चलो पंचायत अभियान' राबविण्यासाठी आज सत्यजित तांबे गडचिरोली जिल्ह्यात आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला. यावेळी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव शिवाणी वडेट्टीवार, अजित सिंह, विश्वजित कोवासे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, लॉरेंस गेडाम, डॉ.चंदा कोडवते, अतुल मल्लेलवार, समशेर खॉ. पठाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला सत्यजित तांबे यांनी चलो पंचायत अभियानाची माहिती दिली. या अभियानांतर्गत युवक काँगेस ५ कलमी कार्यक्रम राबवीत असून, बेरोजगारांना युवा शक्ती कार्ड देण्यात येत आहेत. राज्यात आतापर्यंत साडेचार हजार कार्यक्रम झाले असून आचारसंहिता लागू होईपर्यंत हे अभियान सुरुच राहील. त्यानंतर 'चलो वॉर्ड' अभियान व पुढे 'चलो घर घर' अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

२०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु एनएसएसओच्या सर्वेक्षणानुसार बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या तर नाहीच उलट १ कोटी १६ लाख नोकऱ्या कमी झाल्या. जीएसटी, नोटाबंदी यासारख्या निर्णयांमुळे ही परिस्थिती ओढवली. नोकरी नसल्याने शेतकऱ्यांप्रमाणेच बेरोजगारही निराश होऊन आत्महत्या करु लागले आहेत. ही चिंतेची बाब आहे. बेरोजगार युवकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित करुन त्यांना खेळात गुंतवून ठेवण्‍यासाठी सीएम चषक सारखे कार्यक्रम भाजपचे लोक घेत असल्याचा आरोप तांबे यांनी केला.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे

बेरोजगारी दूर करण्यासाठी काँग्रेसकडे ठोस कार्यक्रम आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार येताच बेरोजगारांना भत्ता देण्यास सुरुवात झाली आहे. तेथील शेतकऱ्यांना २४ तासांत सरसकट कर्जमाफी दिली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस या दोन्ही गोष्टी करेल. शिवाय बेरोजगारांना बिनव्याजी १० लाखांपर्यंत कर्ज देऊ, असे त्यांनी सांगितले. चलो पंचायत अभियानादरम्यान राफेल घोटाळ्याची माहिती देणे व गावागावात युवक काँग्रेसच्या शाखा उघडण्याचे कामही करण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद असल्याचे तांबे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष युवकांना किती वाटा देईल, असा प्रश्न विचारला असता सत्यजित तांबे यांनी 'आम्ही वाटा मागणार नाही. मात्र, ज्या युवकाची क्षमता असेल, त्याला तिकिट मिळावी यासाठी पक्षाध्यक्षांपर्यंत नक्की पाठपुरावा करु, असे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details