गडचिरोली - गतवर्षी पुरामुळे जिल्ह्यातील भामरागड तालुक्याचा तब्बल सातवेळा जगाशी संपर्क तुटला होता. पुरामुळे भामरागड शहराला अक्षरशः बेटाचे स्वरूप आले होते. यावर्षी ही समस्या सुटेल, अशी अपेक्षा असताना नव्या पुलाच्या बांधकामाचा मुहूर्तच सापडला नाही. परिणामी मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार पावसाने भामरागड लगतची पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे भामरागडवासियांना यावर्षीही पुरामुळे वनवास सोसावा लागणार आहे.
भामरागडमध्ये यंदाही पूरपरिस्थिती राहण्याची शक्यता; दरवर्षी पावसाळ्यात २०० गावांचा तुटतो संपर्क - भामरागड पूर
भामरागड तालुक्यातील १२८ गावातील नागरिकांना तालुका मुख्यालयातून महाराष्ट्र राज्यात कुठेही जायचे असल्यास भामरागड-आलापल्ली हाच एकमेव मार्ग आहे. मात्र, पावसाळ्यात भामरागडवरून आलापल्ली मार्गावरील पर्लकोटा नदी व भांडीया नदीच्या कमी उंचाच्या पुलामुळे नेहमी पुलावरून पाणी वाहत असते. त्यामुळे भांडीया नदीमुळे १२८ गावांचा संपर्क तुटतो
गेल्या पावसाळ्यात भामरागड तालुक्यातील नागरिकांचे मोठे हाल झाले होते. या पुराची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भामरागड-आलापल्ली मार्गावरील पर्लकोटा नदीवर ८०० कोटीच्या नव्या पूल बांधकामाला मंजुरी दिली. यावर्षीच्या उन्हाळ्यात पुलाचे बांधकाम सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, बांधकामाचा साधा मुहूर्तही निघालेला नाही. भामरागड-आलापल्ली मार्गावर तालुका सीमा दर्शवणारी भांडीया नदी व भामरागड गावालागत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीवर अतिशय ठेंगणा पुल आहे. कमी उंचीच्या पुलाची समस्या सुटणार, यावर्षी नवीन पुलाचे बंधकाम सुरू होणार, असे तालुकावासीयांच्या वाटत होते. मात्र, भामरागडच्या विकास कामाला "नकटीचा लग्नाला सत्राशे विघ्न" असाच प्रकार घडला. नवीन पुलाचे बांधकाम फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार होते. मात्र, वनविभागाने काम अडविल्यानंतर तोडगा निघणार, असे वाटत असताना लॉकडाऊनच्या समस्येमुळे या दोन्ही पुलांची समस्या सध्यातरी कायम आहे.