गडचिरोली - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी काळात दैनंदिन मजुरी करुन उपजीविका चालविणाऱ्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. अशावेळी कोयनगुडा गावातील रामसु नवलु पुंगाटी व बंडी पुंगाटी या आदिवासी वयोवृद्ध दाम्पत्याच्या घरात पोलिसांनी मोफत वीज मीटर बसवून त्यांच्या जीवनतील अंधार प्रकाशमय केला आहे. भामरागड पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी जीवनावश्यक वस्तू देत मोठा आधार दिला आहे.
आदिवासी विकासासाठी पोलीस दुवा
भामरागडपासून 3 कि. मी. अंतरावर असलेल्या कोयनगुडा गावात रामसु नवलु पुंगाटी व बंडी पुंगाटी हे आदिवासी वयोवृद्ध दाम्पत्य राहतात. रामसु यांच्या जीवनातील अंधारात प्रकाश मिळविण्यासाठी शेकोटी पेटविल्या शिवाय पर्याय नाही. ही बाब भामरागड पोलिसात कार्यरत असलेल्या पोलीस अमलदार निलेश कुळधर, बाळु केकाण यांच्या नजरेत आली. त्यांनी भामरागड पोलीस निरीक्षक यांच्या लक्षात आणून दिली. या बाबीची लगेच दखल घेऊन पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, सोमय मुंढे,समीर शेख,उप विभागिय अधिकारी डॉ. कुणाल सोनवने यांच्या मार्गदर्शनाखाली भामरागडचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी आपल्या चमूसोबत रामसु पुंगाटी यांचा घरी भेट दिली. त्यांच्या घरी वीज मीटर बसवून रामसु व बंडी पुंगाटी या वयोवृध्द निराधार दाम्पत्यांच्या अंधारमय जीवनात प्रकाशाची ज्योत पेटवली. शिवाय जीवनावश्यक साहित्यासोबत भांडे, कपडे देऊन आधार दिला. या मदतीमुळे गडचिरोली पोलीस दल आदिवासी विकासासाठी एक दुवा ठरत आहे.