गडचिरोली - मुंडीगुट्टा जंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर मादी अस्वल आणि तिच्या पिलांनी हल्ला केला. ही घटना शुक्रवारी घडली. जखमी व्यक्ती हा अहेरी तालुक्यातील व्येंकटापूर-आवलमारी या गावातील असून कम्बोजी पोट्टी आत्राम (वय 45) असे त्यांचे नाव आहे. आत्राम हे त्यांच्या पत्नीसह पहाटे तेंदुपाने तोडण्यासाठी गेले होते.
तेंदुची पाने तोडणीसाठी गेलेल्या व्यक्तीवर अस्वलांचा हल्ला - गडचिरोली
तेंदुची पाने तोडण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर अस्वलांनी हल्ला केल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली आहे.
तेंदूपाने तोडत असताना सकाळी 6 वाजताच्या दरम्यान आत्राम यांच्यावर मादी अस्वल व तिच्या दोन पिल्लांनी हल्ला केला. या हल्ल्यात कम्बोजी आत्राम जखमी झाले. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या पत्नीने आरडा-ओरड केली. आवाज ऐकून एक जण मदतीसाठी धावून आला. त्यांने त्या अस्वलांना पळवून लावले. या हल्ल्यात कम्बोजी आत्राम यांच्या पोटावर, छातीवर व मांडीवर आणि पायावर जखमा झाल्या आहेत. त्यांना प्राथमिक उपचारासाठी आवलमारी येथील प्राथमिक आरोग्य पथक येथे दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.