गडचिरोली- खरीप हंगाम तोंडावर असून शेतकऱ्यांसह प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी 26 हजार क्विंटल बियाणे तर 52 हजार मेट्रीक टन खत लागणार आहे. मात्र यापैकी 15 हजार क्विंटलच बियाणे महाबीजकडून प्राप्त होणार असल्याने 11 हजार क्विंटल खासगी बियाणे वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात 2 लाख 22 हजार हेक्टर क्षेत्रावर पीक लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यात गेल्या हंगामात 2 लाख 2 हजार 157 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यात सर्वाधिक 1 लाख 82 हजार 522 हेक्टर क्षेत्रावर धानाची पेरणी होती. तर कापूस 14 हजार, तूर 5 हजार 535, मका 983 हेक्टर, तीळ 328 हेक्टर आणि सोयाबीन 92 हेक्टर व कापूस 13 हजार 975 हेक्टर अशी पेरणी झाली होती.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी सोयाबीन 300 क्टिंवल, तूर 350 क्विंटल, बी. टी. कापूस 197 क्विंटल, मका 144 क्विंटल, उडीद 3 क्विंटल, तीळ एक क्विंटल या प्रमाणे एकूण 27,732 क्विंटल बियाणे या हंगामात लागणार आहेत. तर 52 मेट्रीक टन खतापैकी सर्वाधिक 28025 मे. टन आवश्यकता युरिया खताची राहणार आहे. जिल्ह्यात खतांची 562 दुकाने असून किटकनाशकांची 249 तर बियाण्यांची 336 दुकाने आहेत.
खते व बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी पास मशीन आणि आधार क्रमांकांची मदत घेतली जाणार आहे. याखेरीज 13 भरारी पथकेही निर्माण करण्यात आली आहेत. मात्र यानंतरही काळाबाजार होत असल्याने कृषी विभागाला अधिक दक्ष राहावे लागणार आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 1502.38 मिमी इतके आहे. गेल्या खरीप हंगामात केवळ 1355.31 म्हणजे 95.93 टक्के इतका पाऊस झाला होता. सर्वाधिक 135.10 टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात तर सर्वात कमी 74.78 टक्के पाऊस कोरची तालुका क्षेत्रात झाला होता.