गडचिरोली - कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे शहरा बस आगाराच्या तब्बल 50 हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोज बस आगाराला लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. तर बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्या तरी बाहेर गावातून परतणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने खाजगी वाहतूक धारकांची चांगलीच चांदी होत आहे.
गडचिरोली बस आगारातून अमरावती, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, पुणे, भंडारा-गोंदिया या लांब पल्ल्याच्या बस गाड्यांसह गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात बस सोडल्या जातात. मात्र, कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी प्रशासनाने साथरोग प्रतिबंध कायदा लागू केला आहे. याचा परिणाम बससेवेवरही जाणवला आहे. दररोज 150 बस फेऱ्या सोडले जात असताना सध्या 70 ते 80 बसफेऱ्या धावत आहेत. यामुळे बस आगारात शुकशुकाट दिसत आहे.