गडचिरोली - जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड अशा दुर्गम तालुक्यातील तब्बल 140 बेरोजगार तरुणांना गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून नोकरी मिळाली आहे. या सर्व युवकांना शनिवारी (दि. 28 नोव्हेंबर) जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.
पोलीस दलातर्फे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम
गडचिरोली पोलीस दलातर्फे आदिवासी युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी नेहमीच प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये शिक्षणासाठी असो किंवा रोजगारासाठी. बेरोजगार युवकांसाठी मार्गदर्शन शिबीर, पोलीस भरती प्रशिक्षण असे विविध उपक्रम गडचिरोली पोलीस दलातर्फे राबवले जातात. दुर्गम भागातील आदिवासी युवकांमध्ये गुणवत्ता असतानाही त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने रोजगारासाठी त्यांना अनेक अडचणी येतात. त्यामुळेच जिल्हा पोलीस दलातर्फे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरण सुरू आहे.