धुळे- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथून धुळ्याकडे येण्यासाठी निघालेल्या एका महिलेच्या बॅगेतून अज्ञाताने जवळपास ७५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना धुळे बसस्थानकात लक्षात आल्यावर बस प्रवाशांसहित शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. याठिकाणी प्रत्येक प्रवाशाची बॅग आणि वैयक्तिक तपासणी करण्यात आली. मात्र, यामध्ये काहीही आढळून आले नाही.
बसमध्ये चोरट्याने केला हात साफ, ७५ हजाराची रोकड लंपास - धुळे
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथून धुळ्याकडे येण्यासाठी निघालेल्या एका महिलेच्या बॅगेतून अज्ञाताने जवळपास ७५ हजार रुपयांची रोकड लंपास केली.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील निमगाव येथील लहानबाई अशोक रायभावे या निमगाव येथून धुळ्याला येण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या बॅगेत १ लाख रुपयांची रोख रक्कम होती. मात्र, त्या ज्या बसमध्ये बसल्या होत्या. ती बस मालेगाव येथे खराब झाली. त्यामुळे बसमधील प्रवाशांना नाशिक चोपडा (एमएच-४०-एक्यू-६३८०) या बसमध्ये बसवण्यात आले. लहानबाई रायभावे या धुळे बसस्थानकात उतरत असताना त्यांच्या बॅगेतून पैसे खाली पडत असल्याचे त्यांना इतर प्रवाशांनी लक्षात आणून दिले. यावेळी त्यांनी याबाबत चालक आणि वाहकाला सांगितल्यावर त्यांनी बसमधून अन्य प्रवाशांना उतरू न देता बस थेट धुळे शहर पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
याठिकाणी आल्यावर प्रत्येक प्रवाशांची पोलिसांनी कसून तपासणी केली. मात्र, कोणाकडेही काहीही आढळून आले नाही. लहानबाई रायभावे यांच्या बॅगेतून जवळपास ७५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेली आहे, मात्र या चोरट्याला पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.