धुळे - विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राज्यभरात राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. शहरात शिवसेनेच्या वतीने 'प्रथम ती' या शीर्षकाखाली महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर शुभा राऊळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा ; शुभा राऊळ यांचे महिलांना आवाहन मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेने अप्रत्यक्षपणे स्वबळाचा नारा दिला असून, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
निवडणुकांमध्ये इतर राजकीय पक्ष भविष्यात काय करणार आहेत, हे सांगून आश्वासने देतील; मात्र, शिवसेना आम्ही आजपर्यंत काय केले, हे सांगून आपल्यासमोर विकास कामे ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिवसेना हा वर्तमान काळात काम करणारा पक्ष असल्याचे त्यांनी उच्चारले.
यामुळे, येणाऱ्या निवडणुकीत नवमहाराष्ट्र घडवायचा असल्यास शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन शुभा राऊळ यांनी मेळाव्यात केले आहे.