धुळे - शहरात कोरोनाचा विस्फोट झाला असून रुग्णांवर उपचार होण्यासाठी जिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. विशेषतः गंभीर कोविड रूग्णांना व्हेंटीलेटरची गरज असल्याने त्याची सज्जता ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र जिल्हा शल्यचिकित्सक सांगळे यांनी या आदेशाची गाभिर्याने अंमलबजावणी केली नसल्याचे आज शिवसेनेने केलेल्या पहाणीत उघड झाले.
शिवसेनेने स्पॉट पंचनामा करीत शोधले 11 व्हेंटिलेटर, डॉक्टरच्या निलंबनाची मागणी - धुळे बातमी
धुळे साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालयात आज शिवसेनेने धडक मारून केलेल्या स्पॉट पंचनाम्यात अडगळीत पडलेले ११ व्हेंटीलेटर सापडले आहेत. एका अडगळीच्या खोलीत हे व्हेंटीलेटर लपवून ठेवल्याचे उघड झाल्याने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या निलंबनाची मागणी शिवसेनेने केली आहे.
कोविड रूग्णांसाठी हेंटीलेटर बेड जिल्हा रुग्णालयात असावेत, असे स्पष्ट आदेश असतानाही तब्बल ११ व्हेंटीलेटर एका अडगळीच्या खोलीत लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. हे व्हेंटीलेटर बाहेर काढून त्याची पूजा करीत प्रतिकात्मक निषेधही नोंदविण्यात आला. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निष्काळजीपणामुळे गंभीर कोरोना रुग्णांना व्हेंटीलेटर मिळाले नाहीत. परिणामी, त्यांचा मृत्यू झाल्याने सांगळेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे,अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
निलंबनाची केली मागणी -
शहरासह जिल्हाभरात कोरोनाचा थैमान बघता व्हेंटिलेटरसाठी अनेक रुग्णाची गैरसोय होऊन अनेक रुग्ण मरण पावल्याचे समोर आले आहे. तरी या मृत रुग्णासाठी जबाबदार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सांगळे यांना दोषी ठरवत शिवसेनेने सांगळेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, किरण जोपळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या स्पॉट पंचनाम्याच्यावेळी मनोज मोरे, डॉ.सुशिल महाजन, पंकज गोरे, संजय वाल्हे, राजेश पटवारी, सचिन बडगुजर, संदीप सुर्यवंशी, शेखर बडगुजर, संदीप चव्हाण, केशव माळी आदी उपस्थित होते.
आरोग्यमंत्र्यांनी दिले अश्वासन -
शिवसेनेच्या वतीने केलेल्या मागणीसंदर्भात बोलताना आरोग्यमंत्री स्वतः या प्रकरणाची चौकशी करून सर्व माहिती घेऊन त्यात दोषींवर कारवाही करताना कुठलाच विचार अथवा कसुराई ठेवणार नाही योग्य कारवाई करू असे आश्वासन शिवसेनेला दिले