धुळे - जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर कंपनीचे संचालक संजय वाघ यांनी रविवारी प्रसारमाध्यमांसमोर येऊन झालेल्या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. झालेल्या घटनेची कंपनीने जबाबदारी घेतली आहे तसेच मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. स्फोट कशामुळे झाला याचा शोध घेतला जाईल असे आश्वासनही त्यांनी दिल आहे.
हेही वाचा -धुळे स्फोट प्रकरण; कारखाना बेकायदेशीर असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळ असलेल्या रोमित कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. घटनेनंतर कंपनीच्या विरोधात नागरिकांचा रोष पहावयास मिळत आहे. कंपनीच्या मालकाची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. घटना घडून २४ तासांहून अधिक तास उलटल्यानंतर कंपनीचे संचालक संजय वाघ यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया व्यक्त केली. आता प्रशासन यावर काय कारवाई करते हे बघणे महत्वाचे असणार आहे.