महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संस्कृती; खान्देशात सासुरवाशिणींनी अहिराणी गाणी गात साजरी केली 'अक्षय तृतीया' - शूभ

अक्षय तृतीयेनिमित्त सासुरवाशिणी माहेरी येतात आणि अक्षय तृतीया सण साजरा करतात. यादिवशी सुरु केलेले कोणतेही शूभकार्य हे सिद्धीस जाते आणि त्या कार्याची अक्षय वृद्धी होते, असा समज आहे.

झोका खेळत अहिराणी गाणी गाताना महिला

By

Published : May 7, 2019, 3:29 PM IST

Updated : May 7, 2019, 3:36 PM IST

धुळे- संपूर्ण खान्देशात अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अक्षय तृतीयेनिमित्त सासुरवाशिणी माहेरी येतात आणि हा सण साजरा करतात. खान्देशात या सणाला विशेष महत्व असून अहिराणी गाणी गात अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो.


हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्त हे शुभ मुहूर्त मानले जातात. गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळीत येणारा बलिप्रतिपदेचा मुहूर्त हे 3 पूर्ण आणि अक्षय तृतीयेचा अर्धा मुहूर्त, असे साडेतीन मुहूर्त शुभ मानले जातात. यादिवशी सुरु केलेले कोणतेही शूभ कार्य हे सिद्धीस जाते आणि त्या कार्याची अक्षय वृद्धी होते, असा समज आहे. ज्याचा कधीही क्षय अर्थात नाश होत नाही, त्याला अक्षय म्हटले जाते. अक्षय तृतीयेला अनेकजण शूभ कार्याची सुरुवात करतात. अक्षय तृतीयेचा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाला अनेक पौराणिक संदर्भदेखील देण्यात येतात.


खान्देशात अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाला खान्देशात वेगळं महत्व आहे. अक्षय तृतीयेला खान्देशात खापरावरची पुरणपोळी तयार केली जाते. तसेच बाजारातून आणलेल्या घागरीत पाणी भरून या घागरीवर डांगर हे फळ ठेऊन त्याची पूजा केली जाते. आपल्या पूर्वजांना पाणी मिळावे, यासाठी ही घागर भरण्याची प्रथा आहे. अक्षय तृतीया सणाला खान्देशात सासुरवाशिणी आपल्या माहेरी येतात. माहेरी आल्यावर आपल्या मैत्रिणींसोबत सुख दुःख वाटून घेतात आणि झोक्यावर बसून अहिराणी भाषेतील गाणी म्हणत आपला आनंद व्यक्त करतात.


गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. काळाच्या ओघात आज यात बदल झाले असले, तरी यामागील भावना मात्र आजही तीच आहे. घरातील आजी किंवा आजोबा झोक्यावरची गाणी म्हणताना काही ठिकाणी आजही दिसतात. खान्देशाची ही लोकपरंपरा जपण्याचं काम आजही काही जण करतात. मात्र संस्कृती टिकविण्यासोबतच या उत्सवातील आनंद आणि त्यातून घट्ट होत जाणारी नात्याची वीणदेखील टिकवणं अत्यंत गरजेचं आहे. येणारी पिढी नात्यातील हा मायेचा ओलावा आणि या उत्सवांमागील प्रेमाची भावना टिकवून ठेवेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात.

Last Updated : May 7, 2019, 3:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details