धुळे - जिल्ह्यातील शिरपूर बॉर्डरवर बिजासनी घाट उतरून मध्यप्रदेशच्या हद्दीमध्ये तेलाचा टँकर पलटी झाला. त्यात दोन मुलींसह दांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यातील दोघा चिमुकल्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी देवा सारखे धावून वाचविले आहे. "देव तारी त्याला कोण मारी" असं म्हणतात असाच काहीसा अनुभव मृत दुचाकीस्वार दाम्पत्याच्या जुळ्या बाळांना आला आहे.
धुळे : खाकीतील माणुसकीचे दर्शन, पोलिसांनी वाचवले दोन चिमुकल्यांचे प्राण - पोलिसांनी वाचवले दोन चिमुकल्यांचे प्राण
मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर तेलाचा टँकर पलटी झाल्याने दुचाकीवर मुलांसह जाणाऱ्या दांपत्याला आपला जीव गमवावा लागला. यात आई वडिल आणि दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. मात्र या अपघातातून दुचाकीवर असलेली दोन जुळे मुले थोडक्यात वाचली. पोलिसांनी तातडीने त्यांच्यावर उपचार केल्यामुळे या मुलांना जीवदान मिळाले आहे.
अपघातानंतर आई वडील व दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाल्यानंतर दोघा चिमुकल्यांना वाचवतांना खाकीतील माणुसकीचे दर्शन घडले. अपघात झाल्यानंतर काही क्षणात मध्य प्रदेश पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळी जे दृष्य त्यांना बघावयास मिळाले ते अत्यंत हृदय पिळवटून टाकणारे होते. दोघं आई-वडील व दोन बहिणी अपघातात जागीच मरण पावल्या होत्या. परंतु या दाम्पत्याचे अजून दोन चिमुकले मात्र दैव बलवत्तर असल्यामुळे या दुर्दैवी अपघातांमध्ये बचावले होते. या दोघा चिमुकल्यांना पोलिसांनी पोटच्या मुलासारखं काळजाला लावून त्यांना मायेची ऊब दिली व तत्काळ दवाखान्यात पोहोचवण्याची व्यवस्था केली. अशा परिस्थितीमध्ये हे दोघेही जुळे चिमुकले बचावले आहेत. दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाइकांचा शोध घेणे सुरू आहे. या चिमुकल्यांच्या डोक्यावरील मायेच छत हरपल असल तरीदेखील दोन्ही बाळांना वाचविण्यासाठी प्रसंगावधान दाखवलेल्या खाकीतील देवरूपी पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन या घटनेतून बघायला मिळाले आहे.