Owaisi Criticized PM: नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, चित्रपटाचे प्रमोटर नाहीत- ओवैसींची 'द केरला स्टोरी' चित्रपटावरून टीका
'द केरला स्टोरी' चित्रपटावरून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप आपण पाहत आहोत. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. चित्रपटाचे प्रमोटर नाहीत, अशी खोचक टिका ' द केरला स्टोरी' चित्रपटावरून खासदार असदुद्दीन ओवैसींनी सोमवारी धुळ्यात केली. या चित्रपटावरून त्यांनी हिटलरच्या काळातील एका घटनेचा उल्लेख करून नाव न घेता मोदींची तुलना हिटलरशी केली. मोदींनी माझ्यावर कितीही टिका केली तरी मला फरक पडत नाही, असे ते म्हणाले.
ओवैसींची टिका
By
Published : May 9, 2023, 8:49 AM IST
|
Updated : May 9, 2023, 8:55 AM IST
मोदींनी केवळ चर्चा करणे थांबवावे आणि काम करावे - खासदार असदुद्दीन ओवैसी
धुळे : गेल्या काही दिवसांपासून द केरला स्टोरी चित्रपटावरून वातावरण तापले आहे. बरेच राजकीय नेते यात वैयक्तिक रस दाखवत आहेत. भाजपाच्या वतीने बऱ्याच ठिकाणी या शोचे मोफत आयोजन करण्यात आले होते. धुळ्यात पत्रकारांसोबत बोलताना ओवैसी म्हणाले, 'द केरला स्टोरी' हा चित्रपट खोट्या घटनेवर आधारित आहे. गरीबीचे प्रमाण कमी असलेल्या केरळ राज्याची खरी ओळख वेगळी आहे. शिक्षणात अग्रेसर असलेल्या या राज्यामुळे देशाला सर्वाधिक परकीय चलन मिळते. हे दाखविण्याऐवजी चित्रपटातून भलतेच काही दाखविले जात आहे, असे ते म्हणाले.
कब्रस्थानच्या कामाचा शुभारंभ : एआयएमआयएम पक्षाचे नेते सोमवारी धुळे शहराच्या दौऱ्यावर आले होते. पक्षाचे आमदार फारुख शाह यांनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली. नवविवाहित दांपत्यांना सुखी संसाराच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यात २४ जोडप्यांचे लग्न लागले. तसेच त्यांनी चाळीसगाव रोड कब्रस्थानच्या कामाचा शुभारंभ केला. त्यानंतर चाळीसगाव रोड दोन्ही बाजुस गटार व पेव्हींग ब्लॉक बसविणे कामाचे लोकार्पण देखील केले. मदरसा फलाह दारेन कंपाऊंड वॉल कामाचे लोकार्पण केले.
जनतेला उत्तर द्यावे :राज्यात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. या समस्येवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. लव्ह जिहादच्या नावाने राजकारण आणि जातीयवाद करणाऱ्या शिंदे-फडणविस सरकारने मुली बेपत्ता होण्याच्या घटनांवर जनतेला उत्तर द्यावे. पुस्तक प्रकाशन आणि निवृत्तीच्या मुद्यावरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांवरही टिका केली. मोदींनी केवळ चर्चा करणे थांबवावे आणि काम करावे अशी खोचक टिकाही त्यांनी केली. कर्नाटकच्या जनतेने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन : धुळे शहराचे आमदार फारूख शाह दरवर्षी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करतात. या सोहळ्यात सर्व जाती धर्मातील जोडप्यांचे मोफत लग्न लावले जाते. तसेच या जोडप्यांना संसारोपयोगी साहित्यही मोफत दिले जाते. खासदार असउद्दीन ओवैसी यांचे सायंकाळी साडेपाच वाजता धुळे शहरात आगमन झाले. कब्रस्थानच्या परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे चाळीसगांव रोडवर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ओवैसी थांबलेल्या हाॅटेलमध्ये देखील तरूणांनी सेल्फीसाठी गर्दी केली होती.