महाराष्ट्र

maharashtra

धुळ्यात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन; चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याला हाणले जोडे

By

Published : May 29, 2021, 8:41 PM IST

खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान करण्याचे पाप भाजपचे प्रदेशाध्यक्ष वाचाळवीर आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले असून आज त्यांच्या पुतळ्याला फक्त जोडेच हाणले. यापुढे जिल्ह्या-जिल्ह्यांत त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

Manoj More Oppose Chandrakant Patil Dhule
चंद्रकांत पाटील विरोध मनोज मोरे धुळे

धुळे - छत्रपती शिवराय ते शाहू महाराजांच्या गादीचे वारस असलेल्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान करण्याचे पाप भाजपचे प्रदेशाध्यक्ष वाचाळवीर आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले असून आज त्यांच्या पुतळ्याला फक्त जोडेच हाणले. यापुढे जिल्ह्या-जिल्ह्यांत त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

माहिती देताना मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे

हेही वाचा -निवृत्तीच्या तीन दिवस आधीच प्रकल्प अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

धुळे जिल्हा शाखेतर्फे धुळ्यातील महाराणा प्रताप चौकात चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याला क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोडे हाणले. पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतला. आंदोलनकर्त्या क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनादेखील ताब्यात घेण्यात आले.

काय म्हंटले निवेदनात?

मराठा क्रांती मोर्चाच्या निवेदनात म्हटले आहे की, आज एका वर्तमान पत्रात वाचाळवीर चंद्रकांत पाटलांचे छत्रपती घराण्याचा अपमान करणारे वक्तव्य वाचण्यात आले. त्यात खासदार संभाजी राजेंवर भाजपने केलेल्या उपकाराची मुक्ताफळे उधळली आहेत. संभाजी राजेंना खासदार करण्यापासून तर जगातील सर्वात उंच व भव्य अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचे (जे कधी करायचेच नव्हते) न होणाऱ्या स्मारकाच्या जलपूजनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर जलपूजनाचा तांब्या (लोटा) देऊन सन्मान केल्याचे सांगतात. खरं तर हा सन्मान नसून निवडणुकीच्या तोंडावर निवडून येणाची शाश्वती नसल्याने भारतातील तमाम शिवप्रेमी नागरिकांच्या भावनांशी केलेला खेळ होता. छत्रपतींचा अपमान होता आणि त्या अपमानाच्या पापात तुम्ही खासदार संभाजी राजेंना सहभागी करून घेतले व तमाम शिवप्रेमींच्या डोळ्यात धूळफेक करून सत्तेच राजकीय इप्सित साध्य करून घेतले, असे मराठा क्रांती मोर्चाने म्हंटले.

गेल्या वर्षभरात मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजेंनी पंतप्रधान यांची ४ वेळा मागून वेळ न देणे, हा छत्रपतींचा अपमान आहे. गड किल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी खासदार छत्रपती संभाजी राजेंवर देऊन उपकार केल्याचे तुम्ही सांगतात, पण हे कसे विसरतात की २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रायगडावरील छत्रपतींच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन घेतलेल्या आशीर्वादामुळे झाली. भारतातील तमाम शिवप्रेमींनी देशभर भाजपचे खासदार निवडून दिलेत व नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्याचा सन्मान छत्रपतीच्या आशीर्वादाने प्राप्त झाला. तुमच्या कित्येक पिढ्या जन्माला घातल्या तरी छत्रपतींचे उपकार तुम्ही फेडू शकत नाहीत आणि राज्यसभेची तुमच्या स्वार्थासाठी दिलेली खासदारकी म्हणजे छत्रपती घराण्यावर उपकार म्हणतात, तुम्हाला लाज कशी वाटली नाही? उलट भाजप या देशात सत्तेत आल्यापासून सतत छत्रपतींच्या वारसांचा, तसेच मराठ्यांचा सतत अपमान करत आला. तुमच्या पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात छत्रपतींचा फोटोसुद्धा तुम्ही पूजेसाठी ठेवत नाहीत. मराठा समाजाच्या अनेक बलाढ्य नेते छत्रपतींचे थेट वंशज असलेले छत्रपती खासदार उदयनराजे, विजयसिंह मोहिते पाटील बाळासाहेब विखे पाटील, नारायण राणे व मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पिंजून काढणारे छत्रपती खासदार संभाजी राजे असे अनेक नेते जे कायम त्यांच्या परिसराचे राजेच होते त्यांची साम दाम दंड भेद या पद्धतीने पक्षात घेऊन आज त्यांची काय अवस्था आहे, हे महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे, असे मराठा क्रांती मोर्चाने म्हंटले.

हे सर्व नेतेमंडळी आज जरी तुमच्या सोबत असली तरी ते मनाने नाहीत. येणाऱ्या काळात याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. इकडे मराठ्यांना आरक्षण दिल्याचे गाजर देतात व दुसऱ्या बाजूने सतत मराठा विरोधी भूमिका घेणारा अॅड. सदावर्ते व त्यांची पत्नी जयश्री पाटील यांना आरक्षण विरोधी याचिका दाखल करायला लावतात, ही तुमची नालायक खेळी आता मराठा समाज चांगलाच जाणून आहे. मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्ते जेवढे आहेत ते सर्व भाजपशी व तुमच्या नेत्यांशी संबंधित आहेत हे लपून राहिलेले नाही, असे मराठा क्रांती मोर्चाने म्हंटले आहे.

आंदोलनात हे होते सहभागी

आजच्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, माजी आमदार शरद पाटील, विकास बाबर, प्रदीप जाधव, श्रीरंग जाधव, गोविंद वाघ, विलास ढवळे, रवी नागणे, वामन मोहिते, पप्पू माने, प्रकाश पाटील, साहेबराव देसाई, अतुल सोनवणे, डॉ संजय पाटील आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा -परिचारिका संघटनेच्या वतीने तमाशा कलावंतांना साड्यांसह किराणा किटचे वाटप

ABOUT THE AUTHOR

...view details