धुळे - महापालिका निवडणुकित १६७ उमेदवारांनी आपला खर्च अद्याप सादर केलेला नाही. या उमेदवारांना नोटीस बजवण्यात आली होती. त्यापैकी केवळ ३३ जण सुनावणीला उपस्थित होते. यामुळे अन्य १३४ उमेदवारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
खर्च सादर न केलेल्या उमेदवारांना नोटीस, १३४ जणांवर कारवाईची टांगती तलवार
धुळे महापालिका निवडणुकीतील 167 उमेदवारांनी आपला खर्च अद्याप सादर केला नाही म्हणून नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने नोटीस बजावली होती. त्यापैकी 33 जण सुनावणीला उपस्थित होते.
डिसेंबर, 2018 मध्ये धुळे महापालिकेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ३५६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत २८२ जणांचा पराभव झाला. त्यापैकी १५८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. निवडणुकीत उमेदवारांना आपला खर्च सादर करणे बंधनकारक असते. मात्र, १६७ उमेद्वारांनी आपला खर्च सादर न केल्याने त्यांना नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत नोटीस बजावण्यात आली होती. याबाबत म्हणणे मांडण्यासाठी ८ मे रोजी आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक होते .मात्र, यावेळी फक्त ३३ उमेदवार उपस्थित होते. यामुळे आता उर्वरित १३४ जणांनी सूनावणीकडे पाठ फिरवल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.