धुळे: महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि पान मसाल्याची इतर राज्यांमधून तस्करी होत आहे. कायद्याने बंदी असलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने आणला जात असल्याने पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी एलसीबी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ६ जून रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती मिळाली की, इंदूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकमधून (क्रमांक एम. एच. १८ बीजी ३३०२) गुटख्याची वाहतूक होत आहे. त्यानुसार कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नरडाणा पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल अन्नपूर्णाजवळ आयशर ट्रक येताना दिसल्याने त्यास थांबविण्यात आले.
चौकशीत आढळला गुटखा:पोलीस चौकशी दरम्यान ट्रक चालकाने त्याचे नाव सदाशिव रामचंद्र राठोड (३५, रा. महू जी. इंदूर,मध्यप्रदेश) असे सांगितले. त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीचे नाव सिकंदर कैलास सोनगरा (४५, रा. हरसोला, ता. महू जी. इंदूर) असे सांगितले. त्यांना ट्रकमधील मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे ट्रकमधील मालाची खात्री केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पान मसाला मिळून आला.