धुळे -जिल्ह्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे सध्या मोठ्या प्रमाणात पाणी आणि चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरांना पोसणे कठीण झालेल्या बळीराजाने आपली जनावरे मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणली होती. मात्र, त्यांना ती जनावरे कवडीमोल दराने विकावी लागत आहेत. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. दरम्यान, दावणीवरची जनावरे विकण्याची वेळ येऊ नये म्हणून प्रशासनाने चारा आणि पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दुष्काळाच्या झळा : चाऱ्यासह पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांवर आली जनावरे विकण्याची वेळ
पाणी आणि मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना जनावरे पोसणे कठीण झाले आहे. दुष्काळामुळे हातात पैसे नसल्याने धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर नाईलाजास्तव जनावरे विकण्याची वेळ आली आहे.
संपूर्ण राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. धुळे जिल्ह्यात देखील दुष्काळाची दाहकता प्रचंड आहे. या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. वेळेवर पाणी आणि मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना जनावरे पोसणे कठीण झाले आहे. दुष्काळामुळे हातात पैसे नसल्याने शेतकऱ्यांवर नाईलाजास्तव जनावरे विकण्याची वेळ आली आहे.
मंगळवारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीसाठी आणली होती. १ लाख रुपयांना मिळणारी बैलांची जोडी फक्त ४० ते ५० हजार रुपयांना विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. प्रशासनाने चाऱ्याचे आणि पाण्याचं नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी धुळे जिल्ह्यातील विविध गावातून शेतकरी याठिकाणी आले होते.