धुळे -कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा फटका धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील बसला असून संचारबंदीमुळे बाजार समितीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हे नुकसान सहन करण्यासाठी आम्ही तयार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत दर मंगळवारी शेतकरी आणि व्यापारी आपला माल विक्रीसाठी घेऊन येतात. संचारबंदी मुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवारी बंद असल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. विक्रीसाठी आणलेला भाजीपाला बाजार समितीतच पडून होता. एकीकडे अवकाळी पावसामुळे मोठे संकट आलेले असताना दुसरीकडे संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र, आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आम्ही हे नुकसान सहन करण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.