धुळे - अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानीची भरपाई तत्काळ देण्यासाठी राजकारण्यांनी आपल्या सत्तेच्या सारीपाटाचा चाललेला खेळ थांबवावा. तसेच लवकरात लवकर सरकार स्थापन करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी कळकळीची विनंती धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन २० ते २२ दिवस उलटून देखील अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. यामुळे राज्यातील विविध प्रश्नांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे. एकीकडे संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना दुसरीकडे मात्र सत्तेच्या सारीपाटात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. अतिवृष्टीमुळे कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले असून ८०० ते १ हजार रुपये एवढा कमी हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कांद्याला किमान ३ हजार रुपये क्विंटल भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.