महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खडसे आणि गोटे धुळ्यात भाजपाचे गणित बिघडवणार? - अनिल गोटे लेटेस्ट न्यूज

भाजपाचे ज्येष्ठ नेते गेल्या अनेक महिन्यापासून त्यांना मिळणाऱ्या वागणुकीमुळे नाराज होते. काल त्यांनी भाजपातून राजीनामा दिला. त्यांच्यापूर्वी धुळ्यातील भाजपा नेते अनिल गोटे यांनीही राजीनामा देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. आता हे दोन नेते मिळून उत्तर महाराष्ट्रात काय राजकीय बदल घडवून आणतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Khadse and Anil Gote
खडसे आणि गोटे

By

Published : Oct 22, 2020, 3:41 PM IST

धुळे - उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. भाजपाच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील येणाऱ्या काळात सत्तांतर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी एक पत्रक काढून भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. सध्या हे पत्रक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय असलेला भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राजीनामा अखेर बुधवारी पक्षश्रेष्ठींकडे देण्यात आला. आपण वैयक्तिक कारणामुळे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले. यानंतर शुक्रवारी मुंबई येथे एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी जाहीर प्रवेश होणार आहे. दसऱ्यापूर्वीच एकनाथ खडसे यांचे सीमोल्लंघन होणार असल्याने राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकनाथ खडसे यांचे स्वागत केले आहे.

एकनाथ खडसे यांच्या पूर्वीच धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील भाजपाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सध्या अनिल गोटे यांच्याकडे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पद असून त्यांनी देखील एकनाथ खडसे यांचे स्वागत केले आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपाच्या ताब्यात असलेल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या धुळे जिल्ह्यात धुळे महानगरपालिका, दोंडाईचा नगरपालिका आणि शिरपूर नगरपालिका येथे भाजपाची एक हाती सत्ता आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर करण्यासाठी एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे हे एकत्र येऊन काम करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अनिल गोटे यांनी काढलेले परिपत्रक
अनिल गोटे यांनी काढलेले परिपत्रक

एकनाथ खडसे आणि अनिल गोटे यांच्या एकत्रित येण्याने उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे हात बळकट होण्यास मदत होणार आहे. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी नुकत्याच काढलेल्या एका पत्रकात भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे. सध्या हे पत्रक देखील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. धुळे महानगरपालिकेत भाजपाची एक हाती सत्ता आहे. मात्र, यातील बहुतांश नगरसेवक हे राष्ट्रवादीतून भाजपात गेले आहेत. येणाऱ्या काळात हेच नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत आल्यास धुळे महानगरपालिकेत सत्तांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनिल गोटे यांनी पत्रकाद्वारे केलेल्या आवाहनाला भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते कितपत प्रतिसाद देतात हे औत्सुकत्याचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details