धुळे- शहरासह तालुक्यात अजूनही पुरेशा पावसाला सुरवात झाली नसून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली असून वरुणराजा लवकरात लवकर बरसावा, अशी प्रार्थना शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
धुळ्यातील बळीराजाला वरुणराजाची प्रतीक्षा, पावसाने फिरवली पाठ
राज्यातील मुंबई, उपनगर, कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. परंतु, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे बळीराजा ढगाकडे डोळे लावून आहे.
संपूर्ण राज्यात पावसाला सुरुवात झाली असून पावसाने हाहाकार माजवला आहे. मात्र, धुळे शहरासह तालुक्यात अजूनही पुरेशा पावसाला सुरुवात झालेली नाही. पाऊस लवकर सुरू होईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून पेरणीची तयारी केली आहे. मात्र, पावसाला अजूनही सुरुवात न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. यंदाही पुरेसा पाऊस न झाल्यास जीवन जगणे अधिक कठीण होईल यामुळे पावसाचे लवकरात लवकर आगमन व्हावे, अशी प्रार्थना बळीराजा करत आहे.