धुळे - संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाकडे देखील संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातून गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे कुणाल पाटील हे विजयी झाले होते. यंदाही ते निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. मात्र, या मतदार संघात गेल्या निवडणुकीत विजयी झालेला उमेदवार परत विजयी होत नाही, असा इतिहास आहे, त्यामुळे ते पुन्हा निवडून येतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - संगमनेर विधानसभा आढावा: विखे पाटील पाडणार थोरातांच्या बालेकिल्ल्याला खिंडार?
धुळे विधानसभा मतदार संघात अनेकजण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अनेकांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातून 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे कुणाल पाटील हे 1 लाख 19 हजार 94 मतांनी विजयी झाले होते. पाटील यांनी भाजपच्या मनोहर भदाणे, शिवसेनेचे शरद पाटील आणि राष्ट्रवादीचे किरण पाटील यांचा पराभव केला होता. याही निवडणुकीत पाटील हे रिंगणात असतील हे निश्चित झाले आहे, मात्र ते काँग्रेसकडून निवडणूक लढवतील की अन्य कोणत्या पक्षाकडून हे निश्चित झालेले नाही. पाटील हे शिवसेनेत जातील, अशा चर्चांना गेल्या काही दिवसांपूर्वी उधाण आले होत. मात्र, त्याबाबत खात्रीशीर वृत्त अद्यापही समोर आलेले नाही.
हेही वाचा - आढावा उस्मानाबाद विधानसभेचा : राजेनिंबाळकरांना थोपवण्यासाठी पाटील जाणार भाजपत?