धुळे - गेल्या दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने, तसेच महापालिका प्रशासनाकडून स्वसंरक्षणासाठी कोणतीही वस्तू न मिळाल्याने संतप्त झालेल्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आज अखेर कामबंद आंदोलन केले. धुळे महापालिकेसमोर रस्त्यावर घंटागाड्या लावत कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत होऊन सोशल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा उडाला.
धुळे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन हेही वाचा...संतापजनक..! दाम्पत्याला चक्क टॉयलेटमध्ये क्वारंटाईन, शौचालयातच दिले जेवण
कोरोनाचा शहरात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असताना नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, यात प्रशासनाने घंटागाडी कर्मचार्यांच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अखेर त्यांच्यावर काम बंद आंदोलन करण्याची वेळ आली आहे. शहराच्या विविध भागात कचरा गोळा करण्याचे काम हे कर्मचारी दररोज करत असतात. मात्र, या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेळेवर पगार देण्यात आलेला नाही. तसेच संरक्षणासाठी मास्क आणि सॅनिटायझर देखील देण्यात आलेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले.
कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. 'आम्ही आमचा जीव धोक्यात घालून शहरातील कचरा गोळा करण्याचे काम करत आहोत. मात्र, प्रशासनाने आमच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कुठलीही दखल घेतली नसल्याने आम्हाला कामबंद आंदोलन करावे लागत आहे' असे कर्मचाऱ्यांनी म्हटले. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शहराच्या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत होऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.