धुळे - जिल्ह्यातील शिरपूरकडून मालेगावकडे चारचाकी वाहनातून गांजाची बेकायदेशीररित्या वाहतूक होत असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने चाळीसगाव चौफुली येथे सापळा रचून संबंधित चारचाकी ताब्यात घेतली. गाडीची तपासणी केली असता यामध्ये सुमारे 14 किलो 240 ग्रॅम वजनाचा सुका गांजा आढळून आला. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुक्या गांजासह सुमारे 7 लाख 86 हजार 940 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
14 किलो गांजासह 7 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त, धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सुक्या गांजासह सुमारे 7 लाख 86 हजार 940 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसात गांजा जप्त करण्याच्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शिरपूरकडून मालेगावकडे एका पांढऱ्या रंगाच्या ईरटीगा (कार क्रं. एम एच 43 बीपी 0972) गाडीतून अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने चाळीसगाव चौफुली येथे सापळा रचून संशयीत वाहनाची तपासणी केली. तसेच विनोद मनोहर धोत्रे (वय 33) आणि आकाश वसंत कावळे (वय 22) या दोघांची झडती घेतली असता तसेच वाहनाची तपासणी केली असता वाहनात 14 किलो 240 ग्रॅम वजनाचा 85 हजार 440 रुपये किंमतीचा गांजा आढळला. या कारवाईत पोलिसांनी गांजा, ईरटीका कार, दोन मोबाईल असा सुमारे 7 लाख 86 हजार 940 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हा गांजा शिरपूर येथील सोनू नावाच्या व्यक्तीने दिल्याचे सांगून ऐरोली नवी मुंबई येथील संतोष धोंडीबा गायकवाड यास देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली.