धुळे -तालुक्यातील बुरझड येथील एका बेपत्ता मुलीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी विहिरीत सापडला. दरम्यान, या मुलीचे चार जणांनी अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करत हे कृत्य लपविण्यासाठी तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृतदेहाचे धुळे जिल्हा रुग्णालयात कॅमेऱ्याच्या निगराणीखाली शवविच्छेदन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच यासाठी सोनगीर ग्रामीण रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
विहिरीत १९ वर्षीय तरुणीचा आढळला मृतदेह, सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप - धुळे क्राईम न्यूज
धुळे तालुक्यातील बुरझड येथील 19 वर्षीय तरुणी 19 जुलैला सायंकाळी पाच वाजता घरातून निघून गेली होती. शोध घेऊनही तिचा तपास न लागल्याने तिचे आजोबांनी सोनगीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार सोनगीर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. पोलीस या तरुणीचा शोध घेत असताना मंगळवारी बुरझडचे पोलीस पाटील तानाजी पाटील यांना बुरड शिवारातील एका विहिरीत ती मृतावस्थेत आढळून आली.
धुळे जिल्हा रुग्णालयात या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन करावे, सुरुवातीला याबाबत गुन्हा दाखल करून घेण्याबाबत सोनगीर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना सहकार्य केले नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई व्हावी, या घटनेचा तपास चांगल्या अधिकाऱ्यांकडे द्यावा, दोषींना फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली. दुसरीकडे याप्रकरणी पोलीस ठाण्यात बेपत्ता मुलीच्या आजोबांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी काही जणांची चौकशी केल्याचेही सांगण्यात येत आहे. समाज बांधव आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धुळे जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी ठेलारी समाज बांधवांचा मन वळविण्याचा प्रयत्न केला. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली असून राज्यभरातील ठेलारी समाजबांधवांमध्ये संतापाच लाट उसळली आहे.