धुळे- शिंदखेडा तालुक्यातील साहूर गावातील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा रिक्षातून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. साहूर ते दोंडाई बससेवा अद्यापही सुरु न झाल्याने हा विद्यार्थी बळी ठरला असल्याचा आरोप करत त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. यानंतर प्रशासनाच्या झालेल्या चर्चेनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
दर्शनाचा मृतदेह आणला थेट जिल्हाधिकारी कार्यालयात साहूर गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी साहूर ते दोंडाईचा अशी बस सेवा सुरु करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनावणे हे अनेक वर्षांपासून करत आहे. मात्र, अद्यापही बससेवा सुरु करण्यात आलेली नाही. या गावातील विद्यार्थी साहूर ते दोंडाईचा असा प्रवास रिक्षेने करून शाळेत जातात. या रिक्षात अनेक विद्यार्थी बसवून बेकायदेशीररीत्या अवैध वाहतूक केली जाते.
बुधवारी सकाळी अशाच पद्धतीने साहूर ते दोंडाईला जात असताना इयत्ता पाचव्या वर्गात शिकणारा दर्शन कोळी हा विद्यार्थी रिक्षातून खाली पडला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शानाभाऊ सोनवणे यांच्यासह त्याच्या कुटुंबीयांनी दर्शनचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणून याबाबत प्रशासनाला जाब विचारला. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणाव पसरला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते शानाभाऊ सोनवणे यांनी शिष्टमंडळासह अप्पर जिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्याशी चर्चा केली. बस सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिला. या घटनेला जबाबदार असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शानाभाऊ सोनवणे यांनी केली आहे. यानंतर दर्शन कोळी याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.