धुळे - सातारणे येथे सुमारे १ हजार २६० गोण्या भेसळयुक्त खताचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे खत विक्री करण्यात येणाऱ्या खतांचे नावही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे आढळून आले आहे. याप्रकरणी कृषी विभागाने कारवाई केली आहे.
धुळ्यात भेसळयुक्त खताच्या १ हजार २६० गोण्या जप्त, कृषी विभागाची कारवाई - farmer dhule
निर्माण फर्टीलायझर कारखान्यातून ९ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १ हजार २६० भेसळयुक्त खताच्या गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. खताच्या गोण्यांवर चुकीचे नाव छापणे, चुकीच्या ग्रेडचे उत्पादन करून शासनाची फसवणूक करणे, शेतकऱ्यांची दिशाभूल करणे यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे तालुक्यातील नवलनगर ते सातारणे रस्त्यावर निर्माण फर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड नावाचा खते बनविण्याचा कारखाना आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी या कारखान्याला कृषी अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी केली होती. त्यावेळी त्यांना येथे उत्पादित होणाऱ्या खतात भेसळ होत असल्याचे आणि प्रयोगशाळा नसतानाही खत उत्पादन होत असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार २४८ मेट्रिक टन उत्पादनाची विक्री बंद करण्याचा आदेश कृषी विभागाने दिला होता.
या कारखान्यावर कृषी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा कारवाई केली. या ठिकाणाहून ९ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १ हजार २६० भेसळयुक्त खताच्या गोण्या जप्त करण्यात आल्या. खताच्या गोण्यांवर चुकीचे नाव छापणे, चुकीच्या ग्रेडचे उत्पादन करून शासनाची फसवणूक करणे, शेतकऱ्यांची दिशाभूल करणे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.