चंद्रपूर -महिला डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. श्रीलता श्रीनिवास इडणुरी असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या मृत्युमुळे गुलवाडे हॉस्पिटलमध्ये तणाव निर्माण झाला. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूत महिलेचा मृत्यू; कुटुंबियांचा आरोप, गुलवाडे हॉस्पिटलमध्ये तणाव - Women
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती झालेल्या महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.
श्रीलता यांना प्रसूतीसाठी गुरूवारी सकाळी डॉक्टर कल्पना गुलवाडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र, डॉक्टरने कुठलीही पूर्वकल्पना न देता श्रीलता यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे श्रीलता यांचा मृत्यू झाला, असा आरोप करत कुटुंबीयांनी मृतदेह नेण्यास नकार दिला. प्रसूतीपूर्वी महिलेला कुठलाही त्रास नव्हता. त्यानंतर अचानक तिला स्ट्रोक आल्याचे सांगण्यात आले. तिला प्रसूतीगृहात नेण्यापूर्वी कुठलीही रीतसर कागदपत्राची औपचारिकता पूर्ण करण्यात आली नाही.
डॉक्टरांनी महिलेचे पती किंवा कोणत्याही नातेवाईकांना महिला गंभीर असल्याची माहिती दिली नाही. त्यामुळे जोपर्यंत डॉ. गुलवाडे यांच्याविरोधात कारवाई होत नाही आणि नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अन्य खासगी डॉक्टरांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही चर्चा फिस्कटली. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनाही स्थिती निवाळण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. अखेर याविरोधात तक्रार करण्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आला आहे.