चंद्रपूर - मुलाची वर्तवणूक चांगली नाही म्हणून जुळलेले लग्न मुलींच्या कुटुंबीयांनी तोडले. याच रागातून मुलाने मित्रांसह मुलीचे गाव गाठून फिल्मीस्टाईल तिचे आणि तिच्या आईचे अपहरण केले. ही घटना नागभीड तालुक्यातील बहार्णी येथे मंगळवारी घडली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने नाकाबंदी करून मध्यप्रेदश सीमेवरून आरोपींना अटक करत युवतीसह आईची सुटका केली.
लग्न मोडले म्हणून अपहरण
बहार्णी येथील मुलीचे नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील रुयाळ येथील रामकृष्ण भोयर या युवकाशी लग्न जुळले होते. काही दिवसांपूर्वी साक्षगंधही झाले होते. मात्र, मुलाची वर्तवणूक चांगली नाही, अशी माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी लग्न तोडत तसे मुलाच्या कुटुंबीयांना कळविले. मुलीच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे मुलाचा राग अनावर झाला. त्याने मुलीना पळवून नेण्याचा डाव रचला. पाच मित्रासह मुलीच्या अपहरणाचा बेत आखला. मंगळवारी रामकृष्ण भोयर व त्याचे मित्र वाहनासह मुलीच्या गावात दाखल झाले. रामकृष्ण आणि त्याच्या एका मित्राने मुलीच्या घरात प्रवेश करून बळजबरीने उचलून गाडीत टाकले. दरम्यान, तिच्या आईने आरडाओरड सुरू करताच तिलाही आरोपीने बळजबरीने उचलून गाडीत टाकून गावातून पळ काढला. कान्पा येथे आरोपीने दुसरे वाहन उभे करून ठेवले होते. या वाहनातून रामकृष्ण हा युवती आणि तिच्या आईला घेऊन मध्यप्रदेशच्या दिशेने पसार झाला. तर अन्य आरोपी दुसऱ्या वाहनातून पसार झाले.