चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रासाठी ज्यांच्या 30 वर्षांपूर्वी जमिनी गेल्या त्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही नोकरीत सामावून घेण्यात आले नाही. त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यास वीज केंद्र प्रशासन टाळाटाळ करीत आहे. जर एक महिन्यात हे प्रमाणपत्र नाही दिले तर याविरोधात मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
'नोकरी मिळणे अवघड'
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात भूमिअधिग्रहण करण्यात आले. अनेकांच्या उदरनिर्वाहासाठी असलेले शेत यात गेली. ही संपूर्ण प्रक्रिया तीस वर्षांपूर्वी झाली. मात्र या प्रकल्पग्रस्तांना अजूनही नोकरी मिळाली नाही. यामध्ये चालबर्डी येथील आशिष ढोबे, पद्मापूर येथील मोरेश्वर खोब्रागडे, विचोडा येथील राकेश रामटेके, किटाळी येथील आकाश दुपारे, पडोली येथील हर्षल रामटेके, गुळगाव येथील शिलवंत गेडाम, तुकुम येथील विठ्ठल देवतळे, आवंठा येथील वैभव येरगुडे, चारगाव येथील आशिष राहुलगडे यांचा समावेश आहे. गेल्या तीस वर्षांपासून हे सर्व नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. या सर्व प्रकल्पग्रस्तांनी प्रपत्र मागणीचा अर्ज पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. त्यांना ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याची अपेक्षा होती. मात्र प्रशासनाने ती नाकारली. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळणे अवघड झाले आहे.
'तीव्र आंदोलन करू'
सर्व प्रकल्पग्रस्तांनी यावर संताप व्यक्त केला. आम्ही आणखी किती दिवस वाट बघायची, महाऔष्णिक वीज केंद्राकडून आमची थट्टा केली जात आहे, नोकरी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आमच्या हक्काच्या जमिनीचा आम्हाला मोबदला देण्यात आला नाही. जर पुढील एक महिन्यात आम्हाला न्याय मिळाला नाही, तर चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र प्रशासनाच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा या सर्व प्रकल्पग्रस्तांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.