चंद्रपूर - निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची भाषा करत आहे. मग मागील ५ वर्षापासून हे सरकार काय झोपले होते काय? असा सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच मुख्यमंत्री हे मैदानातून पळ काढलेले पैलवान असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.
मुख्यमंत्री हे मैदानातून पळ काढलेले पैलवान - विजय वडेट्टीवार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात युतीची सत्ता आल्यास आपण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे भाष्य केले होते. यावर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. गेली ५ वर्षे भाजप-सेनेची सत्ता होती. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकारने केलेल्या कर्जमाफीचा फायदा 25 टक्क्याहून कमी शेतकऱ्यांना झाल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा - 'लोकसंख्या किंचित म्हणून अमरावतीतील सोनेरा काकडे गाव विकासापासून वंचित'
हेही वाचा - शिवसेनेच्या २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचा राजीनामा; ऐन निवडणुकीत शिवसेनेला धक्का
सेनेचे राजीनामे खिशात होते. त्यांनी ते बाहेर काढलेच नाहीत. त्यावेळी शेतकरी आठवला नाही काय? त्यावेळी सातबारा कोरा करण्याची सद्बुद्धी सेनेला आली नाही का? असा खोचक सवालही वडेट्टीवार यांनी केला. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. मात्र, यावेळी शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवेल असेही वडेट्टीवार म्हणाले.
मुख्यमंत्री हे मैदानातून पळ काढलेले पैलवान
आम्ही तेल लावून आखाड्यात उतरलो आहोत. मात्र, समोर कोणीच नाही असे भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर वडेट्टीवार यांनी पराभवाच्या भीतीने मुख्यमंत्री हे पळून गेलेले पैलवान असल्याची प्रतिक्रिया दिली. पैलवान हा पैलवान असतो. जो जिंकू शकत नाही तो तेल लावतो. मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य म्हणजे त्यांना समोर पराभव दिसतोय म्हणून त्यांनी अंगाला तेल लावलंय असे वडेट्टीवार म्हणाले.