चंद्रपूर - लॉकडाऊन आणि त्यामुळे झालेली दारूबंदी तळीरामांच्या जिवावर उठल्याचे चित्र आहे. सध्या वाटेल त्या मार्गाने दारू मिळवण्यासाठी मद्यपींची धडपड सुरू आहे. यातच राजूऱ्यातील तळीरामांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातून एक लाख तेरा हजारांची दारू लंपास केली आहे. अद्याप चोरटे फरार असल्याने पोलीस तपास करत आहेत.
तहान काही भागेना.. उत्पादन शुल्क कार्यालयातील दारूसाठ्यावर तळीरामांचा डल्ला..!
लॉकडाऊन आणि त्यामुळे झालेली दारूबंदी तळीरामांच्या जिवावर उठल्याचे चित्र आहे. सध्या वाटेल त्या मार्गाने दारू मिळवण्यासाठी मद्यपींची धडपड सुरू आहे. यातच राजूऱ्यातील तळीरामांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातून एक लाख तेरा हजारांची दारू लंपास केली आहे.
राजूरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाजूला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. नेहमीप्रमाणे शिपाई जगदीश मस्के यांनी कार्यालयाचे मुख्यद्वाराला कुलूप लावून गेले होते. त्यानंतर दोन दिवस शासकीय सुट्टी असल्याने आज (१३ एप्रिल) सकाळी ११.०० वाजता कार्यालयात गेले. यावेळी त्यांना कार्यालयाच्या मुख्यद्वाराचे व लोखंडी दाराचे कुलूप तूटलेल्या स्थितीत आढळले. तसेच तस्करांचा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल गायब होता. यामध्ये दारूबंदीच्या कारवाईत पकडण्यात आलेल्या देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्यांचा समावेश होता.
लंपास झालेल्या दारूची किंमत एक लाख तेरा हजार पाचशे पन्नास रुपये आहे. आता पोलीस या फरार चोरट्यांचा शोध घेत आहेत.