चंद्रपूर -गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुजरुक या गावात एक ऐतिहासिक स्मृतिस्तंभ उभा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाची बातमी रेडिओवर ऐकताच वैनगंगेच्या काठी काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक लाकडी खांब उभा केला. त्यावर निळा झेंडा फडकवून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. त्या लाकडी खांबाशेजारीच आज एक भला मोठा स्तंभ आहे. 6 डिसेंबरला परिसरातील हजारो अनुयायी याठिकाणी एकत्र येऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करतात.
स्वातंत्र्यपुर्व काळात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे वडील देवाजी बापू खोब्रागडे हे वनविभागातील मोठे कंत्राटदार होते. विभाजनपूर्व चंद्रपूर जिल्ह्यातील अहेरी वनक्षेत्रातील तोडलेली लाकडे तारसा बुजरुकला आणली जायची. तारसा बुजरुक येथील वैनगंगेच्या काठावर लाकुड डेपो उभारण्यात आला होता. या डेपोवर गोंडपिपरी तालुक्यातील मजूर कार्यरत होते.