चंद्रपूर :गडचिरोली येथील आंबेशिवणी येथे वाघाची शिकार करण्यात आली होती. आसाम येथे काही आरोपींना ताब्यात घेतले. तेव्हा काही धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार 23 जुलै रोजी वनविभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत गडचिरोली येथील आंबेशिवणी व तेलंगाणा राज्यातील करीमनगर येथून अटक केलेल्या एकूण 13 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. वाघ शिकार प्रकरणी अटक केलेल्या 13 आरोपींना न्यायालयात हजर केले. तेव्हा त्यांची रवानगी गडचिरोली येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. तपासादरम्यान हे रॅकेट संपूर्ण देशात पसरले असल्याची माहिती समोर आली.
संबंधित व्यक्तींवर वनविभागाद्वारे पाळत :मिळालेल्या माहितीच्या आधारे देशामध्ये इतर ठिकाणी असलेल्या संबंधित व्यक्तींवर वनविभागाद्वारे पाळत ठेवण्यात येत होती. याद्वारे प्राप्त सर्व तांत्रिक माहितीचे कौशल्यपूर्ण विश्लेषण करण्यात आले. या शिकारी टोळीचा एका विशेष व्यक्तीशी आर्थिक संबंध असल्याची बाब निष्पन्न झाली होती. ही व्यक्ती दिल्ली स्थित असल्याने वनविभागाच्या विशेष कृती दल चमूने नवी दिल्ली येथे जाऊन सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला. मसराम जाखड नावाच्या व्यक्तीला (वय 81) द्वारका येथून 31 जुलै 2023 रोजी अटक केली. हा आरोपी दिल्ली वनविभागातील निवृत्त वनाधिकारी आहे. मागील बऱ्याच वर्षापासून वाघ शिकाऱ्यांशी त्याने घनिष्ट संबंध ठेवले होते. त्यांच्याकडून आर्थिक लाभ घेत असल्याचा त्याच्यावर संशय होता. परंतु पुराव्याअभावी कोणत्याही यंत्रणेला त्याला अटक करता आले नव्हते. महाराष्ट्र वनविभागाने तांत्रिक तपास करुन आरोपीचे शिकाऱ्यांशी असलेले आर्थिक संबंध उघड केले आहे.
देशातील रॅकेट येणार समोर :तसेच, हा आरोपी अनेक शिकारी टोळ्यांच्या संपर्कात असल्याचे देखील समोर आले. त्यामुळे या माध्यमातून देशाचे विविध भागातील शिकाऱ्यांची माहिती संकलित करुन शिकार रोखण्यास मोठी मदत होणार आहे. आरोपीला जेरबंद करुन गडचिरोली येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्याला न्यायालयाने वनकोठडी सुनावली आहे. आरोपींच्या पुढील तपासातून सावली परिक्षेत्राअंतर्गत वाघांची शिकार झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. याबाबतसुध्दा नव्याने वन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास चंद्रपूर वनविभागाचे चमू व विशेष कृती दल यांच्याद्वारे करण्यात येत आहे.
एकूण 19 आरोपींना अटक : आसाम येथील अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींना देखील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गडचिरोली यांच्या परवानगीने पुढील दोन दिवसात गुवाहटी येथील कारागृहातुन ताब्यात घेण्यात येणार आहे. आजपर्यंत वाघ शिकार प्रकरणात 19 आरोपींचा समावेश दिसून आला आहे. देशपातळीवर देखील आणखी काही आरोपी असल्याची शक्यता तपासाअंती समोर आली आहे, त्याबाबत देखील पुढील तपास सुरु आहे.