चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यात वाघ आणि बिबट्याची दहशत कायम असून मागील दहा दिवसात आत्तापर्यंत चार जणांचा जीव गेला आहे. शुक्रवारी गुंजेवाही परिसरात वाघाने एका वनमजुराला ठार केल्याची घटना समोर आली आहे. अशोक जंगलु चौधरी असे त्या मजुराचे नाव आहे.
चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत, दहा दिवसांत चौथा बळी - kill
सिंदेवाही तालुक्यात मागील दहा दिवसांत वाघ आणि बिबट्याने चार जणांना ठार केले असून, सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे.
सिंदेवाही तालुक्यात हिंस्र जंगली प्राण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मागील दहा दिवसांचा घटनाक्रम बघता गडबोरी येथे बिबट्याने अवघ्या 9 महिन्याच्या चिमुकल्याला घराच्या अंगणातून उचलून नेले. काही दिवसानंतर बिबट्याने पुन्हा एका 65 वर्षीय वृद्धेच्या नरडीचा घोट घेतला. त्यामुळे येथे कमालीचा तणाव निर्माण झाला होता. त्यावर जोवर पालकमंत्री मुनगंटीवार घटनास्थळी येत नाही तोवर मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. अखेर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे प्रत्यक्ष भेट देऊन लिखित आश्वासन दिल्यानंतरच तणाव निवळला होता.
यातच 9 तारखेला मुरमाडी येथे एका पट्टेदार वाघाने तुळशीराम पेंदाम या 65 वर्षीय गुराख्याला ठार केले. शुक्रवारी पुन्हा सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथील चिक मारा मार्ग थ्रेशर मशीन जवळ अशोक जंगलु चौधरी या 57वर्षांच्या वनमजुराला वाघाने आपले शिकार बनविले. त्यामुळे हिंस्र प्राण्यांची दहशत सिंदेवाही तालुक्यात कायम असून गावकरी आपला जीव मूठीत घेवून जगत आहेत.